NSS Winter Camp

मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर 2021-2022 यशस्वीपणे संपन्न…* 

मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 7 दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार  शिबिर मौजे चिंचवड, पोस्ट: बेलावडे, तालुका: मुळशी, जिल्हा : पुणे येथे दि. 30 जानेवारी 2022 ते दि. 05 फेब्रुवारी 2022 या कालावधीत यशस्वीपणे पार पडले.

या  श्रमसंस्कार शिबिरामध्ये महाविद्यालयातील 22 विद्यार्थिनी आणि 33 विद्यार्थी असे एकूण 55 स्वयंसेवक सहभागी झाले होते.

या शिबिराचे उद्घाटन दि. 31 जानेवारी 2022 रोजी सकाळी  11:00 वा. चिंचवड  येथे लोकसेवा परिवाराचे संस्थापक मा. श्री माणिककाका शेडगे व सौ शुभांगीताई शेडगे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. याप्रसंगी चिंचवड गावच्या सरपंच श्रीमती शोभाताई ज्ञानेश्वर कंधारे आणि चिंचवड ग्रामपंचायतीचे सदस्य आणि प्रतिष्ठित मान्यवर व नागरिक देखील उपस्थित होते. तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. सारंग एडके, डॉ. नासिर शेख, डॉ. मुरलीधर गायकवाड, डॉ. संदीप अनपट, इत्यादी उपस्थित होते. या उद्घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण कड यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुशील गंगणे यांनी केले. प्रा. अमोल चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.

शिबिरादरम्यान चिंचवड गावात ग्रामविकासाचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये श्रमदान, ग्राम सर्वेक्षण, माझा गाव कोरोनामुक्त गाव अभियान, जलसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती, लिंगभाव संवेदनशीलता जाणीवजागृती, सामाजिक प्रबोधन, पथनाट्य, बौद्धिक चर्चासत्रे, गटचर्चा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. तसेच स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त माहितीपट व चित्रपटाचे प्रदर्शन देखील करण्यात आले.

शिबिरादरम्यान दररोज सकाळी 8:00 ते दुपारी 12:30  या वेळेत श्रमदान करण्यात आले. यामध्ये गावातील परिसर स्वच्छ करणे, गवत काढणे, गाळ काढणे, शाळा व मंदिरांसाठी मैदान तयार करणे, रस्त्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे इत्यादी कामे करण्यात आली.

शिबिरादरम्यान दररोज दुपारी 3 ते 5 या वेळेत बौद्धिक सत्रात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘उद्याचा भारत घडविताना’ , ‘स्वतःला ओळखताना’, ‘जीवन सुंदर आहे’ , ‘निरोगी जीवनाची गुरुकिल्ली’ ‘श्रद्धा व अंधश्रद्धा: सप्रयोग व्याख्यान’ इत्यादी विषयांवर बौद्धिक सत्र आयोजित करण्यात आले. याप्रसंगी अनुक्रमे प्रा. स्वामीराज भिसे, प्रा. सुशील सूर्यवंशी, श्री मनोज वाबळे, श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री नवनाथ लोंढे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.  

या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, संघ बांधणी, नेतृत्व गुण, भाषिक कौशल्य, समाजाप्रती संवेदनशीलता, एकता व एकात्मता इत्यादींचे धडे प्रत्यक्ष कृतीतून शिकायला मिळाले.

रासेयो स्वयंसेवकांनी ग्राम सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावातील कुटुंबांची सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक परिस्थिती जाणून घेतली आणि त्यासंबंधीचा अहवाल ग्रामपंचायत चिंचवड यांना सुपूर्द करण्यात आला. यामध्ये एकूण 51 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.

4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून ‘आपलं घर’ डोणजे, पुणे या संस्थेच्या सौजन्याने आणि श्रीमती कौशल्या लाड ग्रामीण रुग्णालय गोळेवाडी डोनजे, पुणे यांच्या सहकार्याने गावातील महिलांसाठी स्तनांच्या कर्करोगाविषयी कार्यशाळा व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड गावातील एकूण 38 महिलांनी या शिबीराचा लाभ घेतला.

दि. 05 फेब्रुवारी 2022  रोजी सकाळी 11 वा. या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी मा. श्री किरण मांडे (व्यवस्थापक: आपलं घर पुणे) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संदीप अनपट हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल कांबळे यांनी केले.

शिबिर यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी प्रा. सुशील गंगणे, डॉ. संदीप अनपट, प्रा. अमोल चौधरी यांनी मोलाची भूमिका बजावली व अथक परिश्रम घेतले.

शिबिरादरम्यान प्रा. स्नेहल बोरकर, डॉ. कल्पना वैद्य, प्रा, कोमल गलांडे, प्रा. योगेश करंडे, डॉ. शिल्पा काबरा, डॉ. पूनम शिंदे, डॉ. अश्विनी पारखी, डॉ. स्वप्ना कोल्हटकर, प्रा. स्वप्निल कांबळे, प्रा. प्रमोद सपकाळ, प्रा. गीता पाटील, प्रा. नीता पाटील, प्रा. मंजिरी देशमुख प्रा. स्वाती शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले. हर्षला वाडकर मॅडम, नितीन सुरते यांनी शिबिराला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.

या एक आठवड्याच्या निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिरातून अंदाजे रक्कम रु. 1,00,000/- ची लोकहिताची कामे करण्यात आली, असे चिंचवड ग्रामपंचायतीद्वारे प्रमाणित करण्यात येऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

शिबिर यशस्वीपणे संपन्न होण्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार सर यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सहभागी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार!